पुणे : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धा २०२५-२६ नुकतीच सिंधुदुर्ग येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत १४ वर्षांआतील मुला-मुलींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
या स्पर्धेत थेऊर (ता. हवेली) येथील पै. आयुष दत्तात्रय (आबा) काळे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकाविला. आयुष हा पुणे येथील बिशप इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी असून, या यशामागे त्याला शाळेतील क्रीडा शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
आयुष काळे यांना कुस्तीचे प्राथमिक धडे घरातूनच मिळाले आहेत. त्यांचे आजोबा पै. पांडुरंग काळे हे नामांकित मल्ल होते, तर वडील पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे हे मुंबई महापौर केसरी विजेते मल्ल राहिलेले आहेत. कुटुंबातील या कुस्ती परंपरेचा वारसा आयुष समर्थपणे पुढे नेत असल्याचे या कामगिरीतून दिसून आले.
या स्पर्धेसह यापूर्वी झालेल्या विविध कुस्ती स्पर्धांमध्येही आजोबा, वडील तसेच प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याचे आयुष काळे यांनी सांगितले. या यशाबद्दल आयुष काळे यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
