पुणे : श्रीक्षेत्र थेऊर (ता. हवेली) येथील मौजे थेऊरमधील दळवीवस्ती अंतर्गत रस्त्याच्या बहुप्रतिक्षित कामाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. अनेक वर्षांपासून रखडलेले हे रस्त्याचे काम अखेर मार्गी लागल्याने दळवीवस्तीतील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. भूमिपूजनानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
या रस्त्यासाठी पहिल्या टप्प्यात १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या निधीतून प्राथमिक स्वरूपाचे काम पूर्ण केले जाणार आहे. पुढील काळात टप्प्या-टप्प्याने उर्वरित रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यदूत युवराज काकडे यांनी दिली. रस्त्याच्या कामामुळे परिसरातील दैनंदिन वाहतूक सुलभ होणार असून, पावसाळ्यात नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.
दळवीवस्ती परिसरात शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर हे काम मंजूर झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत संबंधित लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे आभार मानले.
भूमिपूजन कार्यक्रमावेळी आरोग्यदूत युवराज काकडे यांच्यासह भरत कुंजीर, नवनाथ कुंजीर, गणेश साळुंखे, रामचंद्र उर्फ बाबू बोडके, गोरख काळे, बाळासाहेब कुंजीर, तुकाराम कुंजीर, आनंद काकडे, बाळासाहेब गिरमकर, दिलीप गावडे, सुभाष गावडे, पांडुरंग दळवी, उत्तम दळवी, स्वप्नील दळवी, सिद्धेश्वर कुंजीर, अच्युत कुंजीर, शरद कुंजीर, विक्रम काळे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
