पुणे : राज्य निवडणूक आयोगाने आज सोमवारी (दि. १५ डिसेंबर) मुंबईसह राज्यभरातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची अधिकृत घोषणा केली. या घोषणेनंतर संबंधित सर्व महापालिका क्षेत्रांत तत्काळ आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आयोगाच्या वेळापत्रकानुसार १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी केली जाणार आहे.
राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार बृहन्मुंबई महापालिकेत एक सदस्यीय प्रभाग रचना आहे. त्यामुळे मुंबईतील मतदारांना केवळ एकच मत द्यावे लागणार आहे. मात्र उर्वरित २८ महापालिका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने असल्याने तेथील मतदारांना एका प्रभागात साधारण ३ ते ५ मते द्यावी लागतील. बहुतांश ठिकाणी एका प्रभागातून ४ उमेदवार निवडले जातील, तर काही प्रभागांत ३ किंवा ५ उमेदवार असतील.
या निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ ची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. मतदार यादीत दुबार नावे असलेल्या मतदारांच्या नावासमोर डबल स्टार (*) चिन्ह देण्यात आले आहे. अशा मतदारांना कोणत्याही एका मतदान केंद्रावर मतदान करता येणार असून, संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. बृहन्मुंबई महापालिकेत सुमारे ११ लाख दुबार मतदार असून, मुंबईत एकूण १० हजार १११ मतदान केंद्र असतील, अशी माहिती आयोगाने दिली.
राज्यातील २९ महापालिकांमध्ये एकूण २८६९ जागांसाठी निवडणूक होणार असून, सुमारे ३ कोटी ४८ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आरक्षित प्रवर्गातील निवडून येणाऱ्या उमेदवारांना सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे.
महत्वाच्या तारखा :
नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्याचा कालावधी : २३ ते ३० डिसेंबर २०२५
छाननी : ३१ डिसेंबर २०१५
उमेदवारी माघारीची अंतिम मुदत : २ जानेवारी २०२६
अंतिम उमेदवार यादी व निवडणूक चिन्ह वाटप : ३ जानेवारी २०२६
मतदान : १५ जानेवारी २०१६
मतमोजणी : १६ जानेवारी २०२६
