पुणे : स्पष्टपणा, वैचारिक दूरदृष्टी आणि सुसंस्कृत आचरणातून आदर्श व्यक्तिमत्त्व जपणारे महानुभाव पंथाचे महंत गोपालव्यास कपाटे यांच्या देहाच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेला समाजोपयोगी उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत अखिल भारतीय वारकरी मंडळाचे उपाध्यक्ष ह. भ. प. आनंद महाराज तांबे यांनी व्यक्त केले.
मातोश्री रमाई आंबेडकर प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रम शाळा, कुंजीरवाडी येथे महंत गोपालव्यास कपाटे यांचा देहाचा वाढदिवस विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना किराणा किट व खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमात बोलताना महंत गोपालव्यास कपाटे म्हणाले की, “ जन्मदिवस हा केवळ उत्सवाचा नव्हे, तर आपल्या जीवनप्रवासाकडे मागे वळून पाहण्याचा आणि आत्मपरीक्षण करण्याचा दिवस आहे.”
या कार्यक्रमास शाळेच्या प्राचार्या शबाना शेख, अमोल शिंदे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे जिल्हा महानुभाव परिषदेचे प्रचारमंत्री अमोल भोसले यांनी केले, तर आभार अमोल शिंदे यांनी मानले.
याचप्रमाणे महावीर निवासी मुकबधीर विद्यालय, उरुळी कांचन येथेही विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी बहुउद्देशीय सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल कदम, मुख्याध्यापिका स्मिता सपार, बी. एन. भालेराव यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते.
महंत गोपालव्यास कपाटे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक भान जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
