पुणे : मुळशी केसरी प्रतिष्ठानच्या वतीने सलग १८व्या वर्षी आयोजित करण्यात आलेली भव्य मुळशी केसरी कुस्ती स्पर्धा २०२५ मुळशी तालुक्यातील घोटवडे फाटा येथील सुंदरबन लॉनजवळ मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेमुळे मुळशी तालुक्यातील कुस्तीप्रेमींमध्ये नवचैतन्य संचारले असून संपूर्ण परिसर कुस्तीमय वातावरणाने भारावून गेला होता.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील नामांकित व उदयोन्मुख मल्लांनी स्पर्धेत सहभाग घेतला. मातीच्या आखाड्यातील थरारक लढती पाहण्यासाठी हजारो कुस्तीप्रेमी उपस्थित होते. प्राथमिक फेऱ्यांपासून अंतिम सामन्यांपर्यंत प्रत्येक सामना चुरशीचा ठरला.

मुळशी केसरी २०२५चा मानकरी मनीष रायते (इंदापूर) ठरला. अंतिम सामन्यात त्याने दमदार खेळ सादर करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. सागर देवकाते (इंदापूर) याने उपविजेतेपद पटकावले, तर अविनाश गावडे (इंदापूर) तृतीय आणि अभिजित भोईर (मुळशी) चतुर्थ क्रमांकावर राहिला. अमृता केसरीचा मानकरी भारत मदने (बारामती) ठरला, तर मुन्ना झुंजुरके (मुळशी) उपविजेता ठरला.

यावेळी सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी “मुळशीरत्न पुरस्कार २०२५” सुमित–सुनीता कैलास दाभाडे, दर्शन दत्तात्रय काळभोर आणि पै. पृथ्वीराज राजेंद्र मोहोळ यांना प्रदान करण्यात आला. आमदार शंकरभाऊ मांडेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

विजेत्या मल्लांना रोख बक्षिसे, चषक व सन्मानपत्र देण्यात आली. आमदार शंकर मांडेकर, सह. पोलीस आयुक्त मनोज पाटील, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, हिंद केसरी अमोल चडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष राजेंद्र बांदल व सर्व संयोजन समितीचे विशेष कौतुक करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *