पुणे : शहराच्या जटवाडा रस्ता परिसरातील ओहरगावचे माजी सरपंच दादा सांहू पठाण यांची बुधवारी दुपारी जमिनीच्या जुन्या वादातून निर्घृण हत्या करण्यात आली. ११ जणांच्या टोळीने लाठ्याकाठ्या व लोखंडी रॉडने केलेल्या अमानुष हल्ल्यात दादा पठाण यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दादा पठाण यांचे कुटुंब मूळचे ओहरगावचे असून त्यांच्या घरासमोर शेती आहे. याचबरोबर शाळेजवळ त्यांची आणखी एक जमीन आहे. या जमिनीच्या शेजारून जाणाऱ्या छोट्या वाटेवरून अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. कालांतराने या वाटेच्या वादाचे रूपांतर संपूर्ण जमिनीवर हक्क सांगण्यापर्यंत गेले होते. त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये तणाव निर्माण झाला होता.
बुधवारी दुपारी पठाण यांनी जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठी जेसीबी मशीन बोलावली होती. काम सुरू असतानाच ११ जणांची टोळी घटनास्थळी आली आणि कामाला तीव्र विरोध करू लागली. यानंतर वाद वाढत गेला आणि काही क्षणांतच त्याचे हिंसक रूपांतर झाले.
हल्ल्याच्या वेळी पठाण यांच्या कुटुंबातील महिलांनी आरोपींसमोर हात जोडून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी कोणतीही दया न दाखवता दादा पठाण व त्यांच्या दोन मुलांवर लाठ्याकाठ्या, लोखंडी रॉड तसेच लाथाबुक्क्यांनी भीषण हल्ला केला. या हल्ल्यात दादा पठाण यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी इम्रान खान मोईन खान पठाण, जमीर इनायत खान पठाण, मोसीन मोईन खान पठाण, अफरोज खान गयाज खान, अस्लम गयाज पठाण ऊर्फ गुड्डू, हैदर खान गयाज खान पठाण, समीर जमीर पठाण, उमेर जमीर पठाण, फुरकान अजगर पठाण, रामअवतार सागरमल साबू आणि मोईन इनायत खान पठाण अशा ११ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी एका आरोपीला बुधवारी रात्री अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपी फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
