पुणे: उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरातील आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांना मोठी चालना देणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन शिरूर–हवेलीचे लोकप्रिय आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांच्या हस्ते नारळ वाढवून पार पडले. यावेळी एकूण ४३१.८० कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाल्याची घोषणा करण्यात आली असून, या भरीव निधीमुळे उरुळी कांचनच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे.
या निधीतून उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीचे PHC Norms नुसार विस्तारीकरण व देखभाल-दुरुस्ती, टिळेकर वस्ती येथील स्मार्ट स्कूल अंतर्गत जिल्हा परिषद शाळेसाठी नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम, तसेच रेल्वेजवळील ओढ्यावर पूल बांधण्याचे महत्त्वपूर्ण काम करण्यात येणार आहे. या कामांमुळे आरोग्यसेवा अधिक सक्षम होणार असून, शिक्षण आणि वाहतूक सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे.
याप्रसंगी सरपंच ऋतुजा कांचन, माजी पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर, संचिता कांचन, माजी सरपंच व सदस्य संतोष कांचन, अमित बाबा कांचन, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीपनाना वाल्हेकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष कांचन यांच्यासह अलंकार कांचन, जितेंद्र बडेकर, युवराज कांचन, दत्ता कांचन, मयूर कांचन, भाऊसाहेब तुपे, शंकर बडेकर, सुनील कांचन, अजिंक्य कांचन, शक्ती बडेकर, काळूराम मेमाणे, प्रसाद कांचन, आबा चव्हाण, प्रताप कांचन, गणेश कांबळे, संदीप कांचन आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मंजूर निधी अपुरा असल्याचे मत माजी सरपंच व सदस्य संतोष कांचन यांनी व्यक्त केले. यावर आमदार माऊली आबा कटके यांनी आपल्या खास मिश्कील शैलीत उत्तर देताना,
“हा तर फक्त नाश्ता आहे, जेवण अजून बाकी आहे!”
असे उद्गार काढले. त्यांच्या या वक्तव्याने संपूर्ण कार्यक्रमस्थळी एकच हास्यकल्लोळ पसरला.
या भरीव निधीमुळे उरुळी कांचनचा चेहरामोहरा बदलणार असून, येत्या काळात गावाचा सर्वांगीण कायापालट होईल, असा विश्वास यावेळी उपस्थित नागरिक व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
