पुणे : १ जानेवारी शौर्य दिन शांततेत, सुरक्षिततेत आणि उत्साहात साजरा व्हावा, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे दिनांक १७ रोजी आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाच्या उपाययोजना, सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासनाच्या समन्वयाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
भीम अनुयायांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यावर बैठकीत भर देण्यात आला. लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी प्रथमच लोणी काळभोर, कदमवाक वस्ती, कुंजीरवाडी, थेऊर आदी गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, प्रतिष्ठित नागरिक व पत्रकारांना या बैठकीस आमंत्रित केले होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे, लोणी काळभोरचे सरपंच नागेश काळभोर, कदमवाक वस्तीचे उपसरपंच नासिर पठाण, थेऊरचे ग्रामविकास अधिकारी तुकाराम पाटील, वंचित बहुजन आघाडीचे संजय भालेराव, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत गवळी, बामसेफचे श्रीकांत ओव्हाळ, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा कोषाध्यक्ष रवींद्र कदम, हवेली तालुका अध्यक्ष विजय गायकवाड, बहुजन दलित महासंघाचे अध्यक्ष आनंद वैराट यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरपंच नागेश काळभोर यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रशासनाने दिलेली कोणतीही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची ग्वाही दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पन्हाळे यांनी सांगितले की, शौर्य दिनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून, आवश्यक त्या ठिकाणी पेट्रोलिंग वाढविण्यात येणार आहे. ग्राम सुरक्षा दल पोलिस मित्र म्हणून कार्य करेल, तसेच फिरत्या शौचालयांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाईल.
या बैठकीचे नियोजन पोलीस हवालदार रवी आहेर व बापू वाघमोडे यांनी केले.
