पुणे : पुणे जिल्हा परिषद, पुणे तालुका हवेली यांच्या वतीने आयोजित यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव सन २०२५-२६ अंतर्गत तालुकास्तरीय कला-क्रीडा महोत्सव दि. १९ डिसेंबर २०२५ रोजी महात्मा गांधी विद्यालय, उरुळी कांचन येथे मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळी ठीक नऊ वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या कार्यक्रमाला पंचायत समिती हवेलीचे गटशिक्षणाधिकारी हेमंतकुमार खाडे, विस्तार अधिकारी निलेश धानापुणे व ज्ञानदेव खोसे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून जयप्रकाश बेदरे तसेच हवेली तालुक्याच्या माजी उपसभापती हेमलता बडेकर यांनी उपस्थिती लावली. यावेळी महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य भारत भोसले, उपप्राचार्य काशीद सर, पर्यवेक्षक संगीता कुंभार, तसेच शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, केंद्रप्रमुख, क्रीडा शिक्षक व शिंदवणे केंद्रातील सर्व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महोत्सवात खो-खो, कबड्डी, लंगडी, आट्यापाट्या, बेडूक उड्या, धावणे, उंच उडी, लांब उडी, मल्लखांब, लेझीम अशा एकूण २३ स्पर्धा लहान व मोठा गट, मुले-मुली अशा विभागांमध्ये पार पडल्या. हवेली तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविलेल्या संघ व वैयक्तिक स्पर्धकांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. सुमारे ७०० विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने स्पर्धांमध्ये भाग घेतला.
स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी मार्गदर्शक शिक्षक, क्रीडा शिक्षक व पर्यवेक्षक यंत्रणेचे मोलाचे सहकार्य लाभले. लोकनृत्यासाठी जोशी मॅडम, चोरगे मॅडम व रेवती मॅडम यांनी तज्ज्ञ मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था मयूर कांचन यांनी केली. बक्षिसांसाठी जयप्रकाश बेदरे, सुरज चौधरी व जितेंद्र बडेकर यांनी सहकार्य केले.
बक्षीस वितरण समारंभ दिमाखात पार पडला. सूत्रसंचालन रेश्मा शेख व युवराज ताटे यांनी केले. गटशिक्षणाधिकारी हेमंतकुमार खाडे यांनी सर्व स्पर्धांचे निरीक्षण करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले व विजेत्यांना जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता केली.
