पुणे: कदमवाकवस्ती येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच त्यांच्या गुणांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देणे हा या स्नेहसंमेलनाचा मुख्य उद्देश होता.
या सोहळ्यात शेकडो प्रेक्षकांसमोर आत्मविश्वासाने आपल्या कलाविष्काराचे सादरीकरण करणाऱ्या बालकलाकारांचे उपस्थितांकडून तोंडभरून कौतुक करण्यात आले. कलेच्या विविध छटांचे दर्शन घडवणारी “सतरंगी” ही संकल्पना आणि शिवविचारांचा जागर करणारी “शिवचरित्र” ही संकल्पना प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली.
स्नेहसंमेलनाचे उद्घाटन रेनबो स्कूलचे चेअरमन नितीन काळभोर, सेक्रेटरी मंदाकिनी काळभोर, सीईओ प्रथमेश काळभोर, लोणी शहर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक उदय काळभोर, नागेश काळभोर, माजी सरपंच राहुल काळभोर, शिवशाहीर महेश खुळपे, रेनबो स्कूलच्या प्राचार्या मिनल बंडगर, उपप्राचार्य प्रशांत लाव्हरे तसेच रेनबो किड्स कायझेन स्कूलच्या प्राचार्या ऐश्वर्या काळभोर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेत्री भाग्यश्री न्हालवे आणि सिनेअभिनेते विनायक चौगुले यांची विशेष उपस्थिती लाभली.
रेनबो स्कूलचे नृत्य शिक्षक अश्विन मनगुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी डोळ्यांचे पारणे फेडणारी नृत्ये सादर केली. संगीत शिक्षक कार्तिक गोरखे व विद्यार्थ्यांनी सुमधुर गायन सादर केले, तर संगीत शिक्षक शिवराज साने यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तालबद्ध वादनाचे सादरीकरण केले. कराटे शिक्षक प्रफुल्ल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कराटेची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या संपूर्ण नेपथ्य व्यवस्थेची जबाबदारी कला शिक्षक दिपक शितोळे यांनी समर्थपणे सांभाळली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती कुंभार, निलोफर तांबोळी, ऋतुजा देशमुख आणि श्वेता मेटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक पायल बोळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.