पुणे : पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कैलास महादेव कदम यांनी सोमवारी (दि. २२) आपल्या पदाचा राजीनामा दिला. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. मात्र, पुढेही काँग्रेसचे प्राथमिक सदस्य म्हणून कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
डॉ. कदम यांची नियुक्ती दि. ७ ऑक्टोबर २०२१ रोजी तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष खासदार सोनिया गांधी व राष्ट्रीय सरचिटणीस खासदार राहुल गांधी यांच्या आदेशाने पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी करण्यात आली होती. काँग्रेस पक्ष संक्रमण अवस्थेत असताना त्यांनी शहराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी व घरोघरी काँग्रेसचे चिन्ह पोहोचविण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले.
राजीनाम्याच्या पत्रात डॉ. कदम यांनी वैयक्तिक कारणांमुळे पदावरून कार्यमुक्त करण्याची विनंती केली आहे. “मी आज दि. २२ डिसेंबर २०२५ रोजी पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देत असून, पुढे काँग्रेसचा प्राथमिक सदस्य म्हणून काम करणार आहे,” असे त्यांनी नमूद केले आहे .
माध्यमांशी बोलताना डॉ. कदम म्हणाले, “विद्यार्थीदशेपासून पिंपरी-चिंचवड शहर व औद्योगिक पट्ट्यात मी काँग्रेसचे काम करीत आहे. १९९७ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला बिनविरोध निवडून आणण्यात माझी भूमिका होती. २००७, २०१२ मध्येही महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांना विजय मिळवून देण्यात योगदान दिले. २०१२ मध्ये मला महापालिकेत गटनेता व विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली.”
“२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत चिंचवड मतदारसंघाची उमेदवारी मिळाली. पक्ष अडचणीत असताना माझ्या संघटन कौशल्यावर विश्वास ठेवून शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्या काळात पक्षवाढीसाठी शंभर टक्के योगदान दिले आहे. आज केवळ शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून काँग्रेसशी माझी निष्ठा कायम आहे,” असेही त्यांनी सांगितले.
