पुणे : पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, उमेदवारी अर्ज प्रक्रियेत महत्त्वाचे असणारे थकबाकी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) देण्यासाठी पुणे महानगरपालिकेने प्रथमच ऑनलाईन यंत्रणा कार्यान्वित केली आहे. यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मागील निवडणुकांमध्ये ना हरकत प्रमाणपत्रासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणे, तसेच विलंब होणे अशा अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर महापालिकेने सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ साठी https://nocelection.pmc.gov.in ही विशेष ऑनलाईन लिंक उपलब्ध करून दिली आहे.
- दि. २२ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळपर्यंत एकूण २१०० ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून, ही प्रणाली सुरळीतपणे कार्यरत असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. आजच जैनुद्दीन हरून शैख यांना सर्व खात्यांची ऑनलाईन पडताळणी पूर्ण करून, एकत्रित ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले. ऑनलाईन प्रणालीद्वारे प्रमाणपत्र मिळवणारे ते पहिले उमेदवार ठरले आहेत.
या प्रणालीमध्ये पुणे महानगरपालिकेच्या एकूण ४४ खात्यांचा समावेश करण्यात आला असून, उमेदवाराचा अर्ज एकाच वेळी सर्व खात्यांना लिंक केला जात आहे. सर्व पडताळणी पूर्ण झाल्यानंतर उमेदवारास संगणक प्रणालीद्वारे थेट प्रमाणपत्र डाउनलोड करता येत असल्याने वेळ आणि श्रमांची मोठी बचत होत आहे.
या ऑनलाईन ना हरकत प्रमाणपत्र कक्षाचे कामकाज महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) श्री. ओमप्रकाश दिवटे आणि सार्वत्रिक निवडणूक २०२५ थकबाकी ना हरकत प्रमाणपत्र कक्षाचे प्रमुख श्री. रवि पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
नागरिकांना अधिक सोयीस्कर, पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा देण्याच्या उद्देशाने ही प्रणाली राबविण्यात आली असून, यामुळे उमेदवारांची अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ होणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
