पुणे : दि. २० डिसेंबर २०२५ रोजी होली एंजल्स कॉन्व्हेंट स्कूल, मांजरी, पुणे येथील प्राथमिक विभागाचे वार्षिक क्रीडा संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमासाठी चंदन नगर–खराडी विभागाचे नगरसेवक महेंद्र पठारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सोमनाथ मधुकर आव्हाळे, दै. सकाळचे ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत आनंदराव कोबल, शाळेच्या प्राचार्या सिस्टर अलका तसेच व्यवस्थापन समितीच्या प्रमुख सिस्टर मर्सि जॉर्ज यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून क्रीडा संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले आकर्षक सांघिक संचलन, शारीरिक कवायती व विविध क्रीडा स्पर्धांमधील सादरीकरणाने उपस्थित पालक व प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. विद्यार्थ्यांमधील साहसी वृत्ती विकसित व्हावी यासाठी शाळेत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत लाठीकाठी, मल्लखांब, दांडपट्टा तसेच फायर रिंग यांसारख्या साहसी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या सादरीकरणाने उपस्थितांची विशेष दाद मिळवली.
याप्रसंगी अभ्यासेतर कला गुणांसह वार्षिक मूल्यमापनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदके, चषक व प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांमधील सकारात्मकता, जिद्द, ऊर्जा, एकाग्रता व शिस्त या गुणांचे मान्यवर पाहुण्यांनी मनापासून कौतुक केले.
आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
