पुणे : आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, कोरेगाव पार्क, पुणे येथील माजी विद्यार्थी कु. विशाल सुनील मेश्राम (रा. मुरखेल, ता. चार्मोशी, जि. गडचिरोली) यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय शैक्षणिक यश संपादन केले आहे. विशाल यांची इंग्लंडमधील जगप्रसिद्ध लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स (LSE) येथे एम.एससी. (Public Policy) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे . विशेष म्हणजे, LSE हे विद्यापीठ QS जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
सातत्यपूर्ण अभ्यास, उच्च शैक्षणिक गुणवत्ता, शिस्तबद्ध मेहनत आणि दृढ आत्मविश्वास यांच्या बळावर विशाल यांनी हे यश संपादन केले आहे. शासकीय आदिवासी वसतिगृहाच्या पार्श्वभूमीतून जागतिक दर्जाच्या विद्यापीठात प्रवेश मिळवणे ही बाब अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
याशिवाय, विशाल यांना इंग्लंडमधील अन्य नामांकित विद्यापीठांकडूनही प्रवेशाच्या ऑफर्स प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये University of Bristol (QS Rank 51), Durham University (QS Rank 89), Newcastle University (QS Rank 130) आणि University of Liverpool (QS Rank 137) यांचा समावेश आहे. एकाच वेळी यूकेमधील अनेक प्रतिष्ठित विद्यापीठांत निवड होणारे विशाल मेश्राम हे आदिवासी समाजातील मोजक्या विद्यार्थ्यांपैकी एक ठरले आहेत.
शैक्षणिक वर्ष 2023–24 मध्ये विशाल यांनी आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, कोरेगाव पार्क येथे प्रवेश घेतला होता. वसतिगृहामार्फत मिळालेले शैक्षणिक मार्गदर्शन, विविध उपक्रम आणि सातत्यपूर्ण प्रोत्साहनामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला योग्य दिशा मिळाली. सध्या ते अजिम प्रेमजी विद्यापीठ, बेंगळुरू येथे पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत.
या यशाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना विशाल मेश्राम यांनी सांगितले,
“वसतिगृहातील मार्गदर्शन, संस्कार आणि मिळालेल्या प्रोत्साहनामुळेच माझ्या जीवनाला दिशा मिळाली आणि हे यश साध्य करता आले.”
दरम्यान, प्रकल्प अधिकारी श्री. प्रदीप देसाई यांनी विशाल मेश्राम यांची ही कामगिरी केवळ वैयक्तिक यश नसून, ती आदिवासी विकास विभाग व संपूर्ण आदिवासी समाजासाठी अभिमानास्पद असल्याचे नमूद केले. विशाल यांचा शैक्षणिक प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल आणि पुढील काळातही ते आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.