पुणे : अटकेची भीती दाखवून (डिजिटल अरेस्ट) सायबर चोरट्यांनी डेक्कन जिमखाना परिसरातील एका ज्येष्ठ महिलेची तब्बल १७ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून डेक्कन पोलिस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ज्येष्ठ महिला डेक्कन जिमखाना भागात वास्तव्यास आहेत. १२ डिसेंबर रोजी सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्यांच्या बँक खात्याचा वापर काळ्या पैशांच्या व्यवहारासाठी झाल्याचा आरोप करत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तसेच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (CBI) कडून कारवाई होणार असल्याची धमकी देण्यात आली .
या प्रकरणात अटक टाळायची असल्यास तातडीने पैसे भरण्याची मागणी चोरट्यांनी केली. त्यानंतर भीतीपोटी ज्येष्ठ महिलेने १२ ते १९ डिसेंबर दरम्यान वेळोवेळी एकूण १७ लाख रुपये चोरट्यांनी सांगितलेल्या बँक खात्यात जमा केले. पैसे मिळाल्यानंतर काही वेळातच चोरट्यांनी वापरलेले मोबाइल क्रमांक बंद केले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर करत आहेत.
दरम्यान, पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून ईडी, सीबीआय, एनसीबी यांसारख्या तपास यंत्रणांची कारवाई होणार असल्याची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. आतापर्यंत अशा प्रकारांमध्ये कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
सायबर पोलिसांकडून नागरिकांना अशा कॉल्सना बळी न पडण्याचे आणि संशयास्पद संपर्क आल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
