पुणे : भारताचे पाचवे पंतप्रधान व शेतकरी नेते चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त शिंदवणे (ता. हवेली) येथे राष्ट्रीय शेतकरी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. उद्यानविद्या महाविद्यालय, पुणे यांच्या उद्यानविद्या जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे आयोजन केले.
कार्यक्रमात उद्यानविद्या दूतांनी चौधरी चरण सिंग यांच्या कार्याचा आढावा घेत राष्ट्रीय शेतकरी दिनाचे महत्त्व विशद केले. यावेळी कृषी क्षेत्रातील शैक्षणिक संधी तसेच उद्यानविद्या क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे गावातील सर्व शेतकरी बांधवांना निमंत्रित करून “शेतकरी हा केवळ देशाचा आधारस्तंभ नसून देशाचे भवितव्य आहे,” असा संदेश देण्यात आला.
शेतकरी बांधवांनी आपले अनुभव मांडताना, “शेती हा फक्त व्यवसाय नसून ती आपली संस्कृती आहे,” असे उद्गार काढले. त्यामुळे उपस्थितांमध्ये शेतकरी दिनाचे महत्त्व अधिक ठळकपणे अधोरेखित झाले.
कार्यक्रमाचे आयोजन विशाल काळे, पृथ्वीराज रुपणर, प्रताप सुरवसे व किरण पाटील यांनी केले.
या वेळी सरपंच प्रमिला शितोळे, उपसरपंच भाग्यश्रीताई शिंदे, माजी सरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष गणेश महाडिक, ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र जगताप, प्रगतशील शेतकरी कांतिलाल महाडिक, आबासो महाडिक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमासाठी कृषी महाविद्यालय, पुणे येथील सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, सहयोगी संशोधन संचालक गणेश खिंड (पुणे), केंद्रप्रमुख डॉ. सुभाष भालेकर, उद्यानविद्या महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक व कार्यक्रम अधिकारी डॉ. श्रद्धा वाबळे आणि डॉ. सुनील जोगदंड यांचे मार्गदर्शन लाभले.
