पुणे : वडगाव शेरी प्रभाग पाचमध्ये शिवसेनेने अनेक वर्षे प्रभावी प्रतिनिधित्व केले असून, या भागात शिवसेना (शिंदे गट)ची भक्कम संघटनात्मक ताकद आहे. त्यामुळे आगामी पुणे महापालिका निवडणुकीत वडगाव शेरीतील प्रभागांमध्ये किमान दोन जागा शिवसेना शिंदे गटासाठी राखीव ठेवाव्यात, अशी मागणी शिवसेना पुणे शहर उपशहर संघटक उद्धव गलांडे यांनी केली.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप–शिवसेना युती असली, तरी जागावाटपात शिवसेना शिंदे गटाला कमी जागा दिल्या जाण्याची शक्यता असल्याच्या चर्चांमुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर वडगाव शेरीतील शिवसेना (शिंदे गट)च्या कार्यकर्त्यांनी गलांडे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही भूमिका स्पष्ट केली.
या वेळी गलांडे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत खांद्याला खांदा लावून आम्ही काम केले. त्याच धर्तीवर महापालिका निवडणुकीतील तिकीट वाटपातही शिवसेना शिंदे गटाला समान संधी मिळायला हवी. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला आहे. ग्रामपंचायतीपासून महापालिकेपर्यंत शिवसेनेच्या नगरसेवकांनी येथे सातत्याने प्रतिनिधित्व केले आहे.”
येरवडा भागात शिवसेनेचे तीन नगरसेवक होते, तसेच खराडी, लोहगाव आणि वाघोली भागात शिवसेनेची संघटनात्मक ताकद भक्कम असल्याचेही त्यांनी नमूद केले. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील सहा प्रभागांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना संधी द्यावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
यावेळी वडगाव शेरी विधानसभा अध्यक्ष हेमंत बत्ते म्हणाले, “शिवसेना घराघरात पोहोचलेला पक्ष आहे. कार्यकर्त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी युतीत शिवसेनेला योग्य त्या जागा मिळाल्या पाहिजेत.”
पुणे शहर समन्वयक शंकर संगम यांनीही भूमिका मांडताना सांगितले की, “वडगाव शेरीत निष्ठावान शिवसैनिक मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागात किमान दोन जागा शिवसेनेला मिळाव्यात, ही आमची अपेक्षा आहे.”
या पत्रकार परिषदेला छाया रविंद्र गलांडे, रमेश साळुंके, चेतन गलांडे, शाहरुख कुरेशी, विपुल दळवी, विकास गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
