पुणे: उन्नती कन्या विद्यालय, उरुळी कांचन येथील फक्त मुलींच्या इंग्रजी माध्यम (सी.बी.एस.ई. संलग्नता क्र. ११३१४५८) शाळेत यंदाचे वार्षिक स्नेहसंमेलन एका वेगळ्या आणि कलात्मक संकल्पनेत साजरे झाले. ‘Journey of Dance’ ही या कार्यक्रमाची संकल्पना असून, भारतीय नृत्याचा हजारो वर्षांचा प्रवास विद्यार्थिनींनी रंगमंचावर प्रभावीपणे सादर केला.
शाळेचे अध्यक्ष नयॉन सुरेश कांचन, संस्थापक डॉ. नुपूर सुरेश कांचन तसेच मुख्याध्यापिका पद्मादेवी विडप यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. इ.स. पूर्व १०० पासून ते आजच्या डिजिटल युगापर्यंत भारतीय नृत्यकलेत झालेल्या बदलांचा प्रवास विद्यार्थिनींनी नृत्याच्या माध्यमातून उलगडून दाखविला.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. त्यानंतर शिवतांडव, मध्ययुगीन नृत्यप्रकार, आदिवासी नृत्य, गोंधळ, लावणी, कोळी, भांगडा, घुमर, मुद्रा, नवरस, भरतनाट्यम, रासलीला, बॉलीवूड, टॉलीवूड अशा एकूण २८ नृत्यप्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. प्रत्येक नृत्यातून भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा आणि त्यातील कालानुरूप झालेले बदल प्रभावीपणे मांडण्यात आले.
मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अपेक्षा नाईकरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यांनी विद्यार्थिनींच्या कलागुणांचे कौतुक करत मार्गदर्शन केले. यावेळी विविध शाळांचे मुख्याध्यापक, पत्रकार तसेच मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाचे नियोजन समन्वयिका केतकी खोपे, मीनल गव्हाणे आणि योजना जगदाळे यांनी व्यवस्थापक आफरीन सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
सूत्रसंचालन संयोजता मुगळे आणि विद्यार्थिनी तेजल बिरंगळ यांनी केले. तांत्रिक बाजू ऐश्वर्या भोसले यांनी सांभाळली, तर नृत्य दिग्दर्शन अमृता कोळपकर, विशाखा पवार, सिरीला हजारे आणि पल्लवी काटदरे यांनी केले. सर्व शिक्षकवर्ग आणि मदतनिसांच्या सहकार्यामुळे हा सोहळा यशस्वीपणे पार पडला.
