पुणे : राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील प्राध्यापकाचा खेड तालुक्यातील मंदोशी येथे मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. भानुदास मोतीलाल परदेशी (वय ५२, रा. मोशी, शिवालय अपार्टमेंट, इंद्रायणी कॉलनी, हवेली) असे मृत प्राध्यापकाचे नाव आहे.
पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, प्रा. परदेशी हे गेल्या २२ वर्षांपासून हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात जीवशास्त्र विषय अध्यापन करत होते. ते बुधवारपासून बेपत्ता होते. त्यांच्या शोधादरम्यान मंदोशी येथील भैरवनाथ मंदिर परिसरात त्यांची दुचाकी आढळून आली. त्यानंतर परिसरातील विहिरीत शोध घेतला असता त्यांचा मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्य केले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. कुटुंबीयांकडे चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
