पुणे : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मद्यपी वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. आगामी महापालिका निवडणूक तसेच कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयात शुक्रवारी (दि. २६) वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरात सर्वत्र दक्षता ठेवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
नववर्ष स्वागताच्या निमित्ताने पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. विशेषतः लष्कर, बंडगार्डन, कोरेगाव पार्क, बाणेर, बालेवाडी या भागांत पब, रेस्टॉरंट आणि हॉटेल्सची संख्या अधिक असल्याने येथे नागरिकांची व तरुणांची गर्दी वाढते. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संबंधित परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मद्यप्राशन करून वाहन चालविणे, भरधाव वेगाने वाहने चालविणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्यांविरोधात तत्काळ व कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. पब, रेस्टॉरंट व हॉटेलच्या परिसरात नियमित गस्त घालून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले.
वाहतूक शाखेला विशेष तपासणी मोहिमा राबविण्याचे आदेश देण्यात आले असून प्रमुख चौक, मुख्य रस्ते आणि गर्दीच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. नागरिकांनी कायदा व सुव्यवस्थेला सहकार्य करावे, नियमांचे पालन करावे आणि सुरक्षितपणे नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.
शहरात शांतता, सुरक्षितता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून कोणत्याही गैरप्रकाराला अजिबात थारा दिला जाणार नाही, असा इशाराही या वेळी देण्यात आला.
