पुणे: सध्याच्या काळात अत्यंत गंभीर बनलेल्या पाणी व हवेच्या प्रदूषणाच्या समस्यांवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रभावी उपाय शक्य असल्याचे सिद्ध करणारे प्रात्यक्षिक ‘इको आईस’च्या वतीने बोट क्लब येथे सादर करण्यात आले.

यावेळी प्रोजेक्ट ड्रॉपलेट आणि जलशुद्धी या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. प्रोजेक्ट ड्रॉपलेट अंतर्गत सौर ऊर्जा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने बोटीचा वापर करून नदी व अन्य जलस्त्रोतांमधील पाण्याची शुद्धता, प्रदूषणाचे प्रमाण तसेच पर्यावरणीय घटकांचे परीक्षण करण्यात येते. पाण्यातील परिसंस्थेची सविस्तर माहिती त्वरित डॅशबोर्डवर उपलब्ध होत असल्याने निर्णयप्रक्रिया अधिक प्रभावी होते.

फ्लुईड ऍनालिटिक्सच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या या प्रकल्पाला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडून सन २०२४ साठी ‘को-प्रेन्युअर ऑफ द इयर’ हे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले असल्याची माहिती ‘इको आईस’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. करण चव्हाण यांनी दिली.

याच कार्यक्रमात पाण्यातील दूषित घटक जाळून टाकून आरओ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ते पाणी पिण्यायोग्य बनवणाऱ्या जलशुद्धी या यंत्रणेचेही प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. ही यंत्रणा घरगुती वापरापासून ते मोठ्या जलसाठ्यांपर्यंत पाणी शुद्ध करण्यासाठी उपयुक्त असून, या तंत्रज्ञानाच्या मदतीने पाण्याचा पुनर्वापर करून पाणीटंचाईवर मात करणे शक्य असल्याचा दावा डॉ. चव्हाण यांनी केला. याशिवाय ड्रोनच्या साहाय्याने हवा शुद्ध करण्याचे तंत्रज्ञानही उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला विद्या प्रतिष्ठानच्या संचालक रजनी इंदुलकर, अतुल चंद्र, श्रुती बापट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

रजनी इंदुलकर म्हणाल्या, “शुद्ध पाणी, प्रदूषित हवा आणि अनिर्बंध कचरा या आजच्या काळातील मोठ्या समस्या आहेत. त्यापैकी हवा आणि पाणी शुद्ध करण्यासाठी संशोधनातून तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या तरुणांचे हे कार्य कौतुकास्पद असून त्यांना योग्य ते प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *