पुणे : ‘शिक्षणाचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील मध्यवर्ती आणि तुलनेने विकसित भागात असलेल्या नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता व जंगली महाराज रस्त्यावर सार्वजनिक स्वच्छतागृहांचा तीव्र अभाव जाणवत आहे. परदेशातून शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी, रोजच्या कामासाठी प्रवास करणारे नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि पदपथ विक्रेते यांना स्वच्छतागृहांसाठी शोधाशोध करावी लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
या दोन्ही रस्त्यांवर मिळून केवळ तीन सार्वजनिक स्वच्छतागृहे असून त्यातील एक फक्त पुरुषांसाठी खुले आहे. नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील महिलांसाठीचे एकमेव स्वच्छतागृह नुकतेच पाडण्यात आल्याने महिलांची गैरसोय अधिक वाढली आहे. नामांकित शिक्षणसंस्था, नाट्यगृहे, कार्यालये आणि दुकाने असलेल्या या परिसरात ही परिस्थिती लज्जास्पद असल्याची प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.
फर्ग्युसन महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परकीय भाषा विभाग, सीओईपी, बालगंधर्व, गरवारे सर्कल आदी ठिकाणांमुळे या रस्त्यांवर दिवसभर वर्दळ असते. मात्र, स्वच्छतागृहांच्या अभावामुळे अनेकांना पाणी कमी पिणे, अस्वस्थता सहन करणे अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तज्ज्ञांच्या मते यामुळे पचनसंस्थेचे विकार, मूत्राशयाचे आजार तसेच मानसिक ताण वाढण्याचा धोका आहे.
या मार्गावरून प्रवास करणारी एक विद्यार्थिनी सांगते, “स्वच्छतागृहांचा प्रश्न रोजचाच आहे. महाविद्यालयात पोहोचेपर्यंत सतत भीती वाटते, अभ्यासात लक्ष लागत नाही.” पदपथ विक्रेत्यांची अवस्था अधिक बिकट असून कर भरूनही मूलभूत सुविधा मिळत नसल्याची खंत ते व्यक्त करतात .
हॉटेल्स व कॅफेची स्वच्छतागृहे वापरण्याची मुभा देऊनही प्रश्न सुटलेला नाही. निवडणुकांच्या तोंडावर मोठ्या प्रकल्पांची आश्वासने देण्याऐवजी लघुशंकेसारख्या मूलभूत हक्कासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पुणेकरांकडून होत आहे.
