पुणे : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जे. के. फाउंडेशन आणि ग्रामपंचायत सोरतापवाडी (ता. हवेली) यांच्या संयुक्त विद्यमाने गावात ‘पारंबी कलादालन’ या नावीन्यपूर्ण कला व उद्योजकता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. रविवार (दि. २८) रोजी हनुमान मंदिरासमोर सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत झालेल्या या उपक्रमाला महिलांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

वटवृक्षाच्या पारंबीप्रमाणे नव्या संकल्पना, नवनिर्मिती आणि आत्मनिर्भरतेला बळ देण्याच्या उद्देशाने या उपक्रमास ‘पारंबी’ असे अर्थपूर्ण नाव देण्यात आले. पारंबी ही केवळ फांदी नसून नव्या ध्येयाकडे नेणारी वाट आहे, हा प्रेरणादायी संदेश या कलादालनाच्या माध्यमातून देण्यात आला.

या कलादालनात सोरतापवाडीतील महिला उद्योजिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. महिलांनी स्वतः तयार केलेले खाद्यपदार्थ, वस्त्रे, विणकाम व हातमागावरील उत्पादने, ज्वेलरी, हस्तकला वस्तू, सौंदर्यप्रसाधने, आयुर्वेदिक औषधे, मिठाई, उन्हाळी पदार्थ, तसेच पाणीपुरी, भेळ, केक, तरकारी, मसाला दूध, व्हेज-नॉनव्हेज पदार्थ अशा सुमारे ५० हून अधिक स्टॉल्स उभारण्यात आल्या होत्या.

महिलांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन व विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि आर्थिक स्वावलंबनाची दिशा मिळावी, या सकारात्मक उद्देशाने ही संकल्पना सरपंच सुनिता कारभारी चौधरी यांनी मांडली . जे. के. फाउंडेशनच्या अध्यक्षा शीतल जयप्रकाश चौधरी यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्थानिक महिला उद्योजिकांना प्रोत्साहन दिले. महिलांच्या स्टॉल्सवर खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. लहान मुलांसाठी खेळजत्रेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच पारंपरिक जागरण-गोंधळ कार्यक्रमाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

या कार्यक्रमास ह.भ.प. चैतन्य महाराज वाडेकर, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे संचालक सुदर्शन चौधरी,
साधना सहकारी बँकेच्या अध्यक्षा वंदना काळभोर, पेठ गावच्या माजी सरपंच शोभा चौधरी, बिवरी गावच्या सरपंच उत्कर्षा गोते, प्रतिभा कांचन, पल्लवी काळे, पुनम चौधरी, अजिंक्य कांचन, उपसरपंच विलास शंकर चौधरी, ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड
यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘पारंबी कलादालन’मुळे महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

ग्रामीण भागातील महिला उद्योजकतेस चालना देणारा हा उपक्रम ठरल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *