पुणे : महाविकास आघाडीबाबत आमच्या भूमिकेत कोणताही संभ्रम नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शिरूर हवेली चे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे महाविकास आघाडीच्या चर्चेला न बसता थेट अजित पवार यांच्यासोबत बसत असल्याने संभ्रम निर्माण होत आहे. असेच करायचे होते तर महाविकास आघाडीचे सोपस्कार केलेच कशाला? असा संतप्त सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्क नेते सचिन अहिर यांनी केला.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आकुर्डी येथील शिवसेना भवनमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाप्रमुख ॲड. गौतम चाबुकस्वार, युवा सेनेचे नेते चेतन पवार, उपजिल्हाप्रमुख हाजी दस्तगीर मणियार, रोमी संधू, अनिता तुतारे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना सचिन अहिर म्हणाले, “महापालिका निवडणुकीसाठी आमची पहिली अंतिम उमेदवार यादी रविवारी सायंकाळी सहा ते सात वाजताच्या दरम्यान, किंवा फार तर सोमवारी पक्षप्रमुखांचा आदेश घेऊन जाहीर केली जाईल.”
महाविकास आघाडीतील चर्चांबाबत बोलताना अहिर यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “राज्यात सत्तेत असलेल्या अजित पवार यांच्यासोबत जाणे शक्य नाही, ही आमची ठाम भूमिका आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून एकत्र आलो तर आम्ही आजही बरोबर आहोत. मात्र डॉ. अमोल कोल्हे हे आघाडीच्या चर्चेला न बसता अजित पवारांबरोबर बसतात. पुढे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. अजित पवारांशीच चर्चा करायची होती तर महाविकास आघाडीचे सोपस्कार का केले?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावेळी अहिर यांनी पुढे माहिती देताना सांगितले की, काँग्रेस, मनसे तसेच अन्य समविचारी पक्षांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. वंचित बहुजन आघाडीशीही चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
