पुणे : पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी शिवाजीनगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर भवनामधील निवडणूक कार्यालयातील नव्या सभागृहाचे उद्घाटन केले. यानंतर त्यांनी निवडणूक कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या ‘ना हरकत कक्षा’ला अचानक भेट देत तेथील कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली.

या भेटीदरम्यान आयुक्तांनी कक्षामधील अर्ज प्रक्रिया, वेळापत्रक व कार्यपद्धतीची सविस्तर माहिती घेतली. नागरिकांना आवश्यक असणारी ना हरकत प्रमाणपत्रे (NOC) वेळेत, पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने देण्यात यावीत, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या . निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारचा विलंब अथवा तक्रारी उद्भवू नयेत, यासाठी सर्व अर्जांची तातडीने पूर्तता करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

यावेळी आयुक्त राम यांनी निवडणूक कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी सर्व विभागांना अशाच प्रकारे अचानक भेटी देण्यात येतील, असे स्पष्ट केले. निवडणूक प्रक्रिया सुलभ, निष्पक्ष व नागरिकाभिमुख राहावी, यासाठी महापालिका प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त प्रसाद काटकर, रवी पवार, अरविंद माळी, तुषार बाबर तसेच सहाय्यक आयुक्त सोमनाथ आढाव, कैलास केंद्रे, इंद्रायणी करचे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *