पुणे : पूर्व पुण्यातील वडगाव शेरी परिसरातून एक उच्चशिक्षित, अभ्यासू आणि सामाजिक जाणीव असलेले दांपत्य पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

ऐश्वर्या पठारे आणि सुरेंद्र पठारे या पती-पत्नीने भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले असून, ऐश्वर्या पठारे प्रभाग क्रमांक ३ तर सुरेंद्र पठारे प्रभाग क्रमांक ४ मधून निवडणूक लढवत आहेत.

सुरेंद्र पठारे हे पुण्यातील प्रतिष्ठित COEP (कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे) येथून गोल्ड मेडलिस्ट असून, तांत्रिक व प्रशासकीय दृष्टिकोनासाठी ते ओळखले जातात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला होता. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशानंतर पूर्व पुण्यात भाजपला अभ्यासू आणि सक्षम नेतृत्व मिळाल्याची भावना पक्षात व्यक्त होत आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील ‘टीम देवेंद्र’ला पूर्व पुण्यातून एक मजबूत चेहरा मिळाल्याचे बोलले जात आहे. सुरेंद्र पठारे यांच्या माध्यमातून विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, त्यांच्या पत्नी ऐश्वर्या पठारे यांनीही प्रभाग क्रमांक ३ मधून राजकीय मैदानात उतरत आपली सक्रिय राजकीय वाटचाल सुरू केली आहे. उच्चशिक्षित उद्योजिका असलेल्या ऐश्वर्या पठारे यांचा सामाजिक क्षेत्रात ठसा आहे. महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या सखी प्रेरणा मंचच्या माध्यमातून त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. नेतृत्व विकास, महिलांचे स्वावलंबन आणि सामाजिक जागृती यावर त्यांचा विशेष भर राहिला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र शासनाचा युवा पुरस्कार (२०१४) आणि फायनान्शियल टाइम्स बिझनेस अवॉर्ड (२०२२) प्रदान करण्यात आला आहे.

वडगाव शेरी परिसरात हजारो महिलांना एकत्र आणत त्यांनी राबवलेला जेजुरी हरिद्रा मार्तंड पूजा उपक्रम विशेष चर्चेत राहिला. हा उपक्रम केवळ धार्मिक न राहता सामाजिक एकतेचे प्रतीक ठरला.

महिलांच्या सहभागातून उभ्या राहिलेल्या या उपक्रमामुळे ऐश्वर्या पठारे यांची ओळख प्रभावी सामाजिक कार्यकर्त्या आणि नेतृत्व म्हणून अधिक दृढ झाली आहे.

एकीकडे तांत्रिक, अभ्यासू पार्श्वभूमी असलेले सुरेंद्र पठारे आणि दुसरीकडे सामाजिक जाणीव व उद्योजकीय दृष्टिकोन असलेल्या ऐश्वर्या पठारे— या दांपत्यामुळे पूर्व पुण्यातील महापालिका निवडणूक अधिकच रंगतदार होणार, हे स्पष्ट आहे.

उच्चशिक्षित, तरुण आणि विकासाभिमुख नेतृत्वाला मतदार कसा प्रतिसाद देतात, याकडे आता संपूर्ण पुण्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *