पुणे : अष्टापूर (ता. हवेली) येथील खोल शेत वस्ती परिसरात मंगळवारी (ता. ३०) वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अखेर जेरबंद करण्यात आला.
गेल्या वर्षभरापासून अष्टापूर व परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर वनविभागाने केलेल्या या कारवाईमुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
याच महिन्यात खोल शेती परिसरात एका महिलेवर बिबट्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात ती महिला गंभीर जखमी झाली होती. तसेच दोन दिवसांपूर्वी अष्टापूर येथील पठार वस्तीतील उसाच्या शेतात बिबट्याची लहान पिल्ले आढळून आली होती. त्यापैकी एक पिल्लू वनविभागाने तात्काळ रेस्क्यू केले होते. या घटनांवरून अष्टापूर गावामध्ये बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याचे स्पष्ट झाले होते.
या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला नुकसानभरपाई मिळावी, यासाठी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक शामराव दादा कोतवाल, मा. संचालक श्रीहरी दादा कोतवाल, अष्टापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. पुष्पा सुरेश कोतवाल, उपसरपंच संजय भिकू कोतवाल, माजी सरपंच व उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी वनविभाग व शिरूर-हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांच्याकडे निवेदन दिले होते.

या मागणीची दखल घेत आमदार माऊली आबा कटके यांनी शासनातर्फे संबंधित महिलेला पाच लाख रुपयांचा धनादेश नुकसानभरपाई म्हणून सुपूर्द केला. याबद्दल यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक शामराव कोतवाल व श्रीहरी कोतवाल यांनी आमदारांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.
ही संपूर्ण कारवाई वनपरिक्षेत्राधिकारी वरक, वन परिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर, वनरक्षक कोमल सपकाळ आणि वनसेवक बाजारे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.
