पुणे : कात्रजमधील आंबेगाव बुद्रुक परिसरात प्रेम प्रकरणाच्या वादातून एका तरुणाचा तीक्ष्ण शस्त्राने खून करून पसार झालेल्या दोन आरोपींना आंबेगाव पोलिसांनी नांदेड जिल्ह्यातून अटक केली आहे. ही घटना २२ डिसेंबर रोजी घडली होती.
जावेद खादमियाँ पठाण (वय ३४, रा. भोकर, जि. नांदेड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी संदीप रंगराव भुरके (वय २५) आणि ओमप्रसाद उर्फ दत्ता गणेश किरकन (वय २०, दोघे रा. चिखलवाडी, प्रफुल्लनगर, ता. भोकर, जि. नांदेड) यांना अटक करण्यात आली आहे.
जावेद पठाण हा आंबेगाव बुद्रुक येथील गायमुख चौक परिसरातील एका वॉशिंग सेंटरमध्ये काम करत होता. आरोपींच्या नात्यातील एका तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध होते. हे संबंध तोडावेत, अशी आरोपींनी त्याला वारंवार सूचना केली होती. याच कारणावरून त्यांच्यात वाद झाले होते.
२२ डिसेंबर रोजी आरोपी पुण्यात आले. वॉशिंग सेंटरमध्ये काम करत असताना त्यांनी पठाण याला गाठून त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले आणि घटनास्थळावरून पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या पठाण याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू होता. आरोपी नांदेडमध्ये असल्याची माहिती मिळताच आंबेगाव पोलिसांचे पथक तेथे रवाना झाले आणि भुरके व किरकन यांना अटक करण्यात आली.

ही कारवाई अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलिस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
आंबेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन चोरमले, पोलिस उपनिरीक्षक मोहन कळमकर तसेच पोलिस कर्मचारी शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हनुमंत मासाळ, नीलेश जमदाडे, हरिष गायकवाड व धनाजी धोत्रे यांनी ही कामगिरी केली.
