पुणे : शिरूर तालुक्यातील फाकडे आणि चांडोह परिसरात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी (ता. २९) दोन मादी बिबट्या जेरबंद झाल्या. शिरूर परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लक्षात घेता वन विभागाने राबवलेल्या मोहिमेत आतापर्यंत एकूण २५ बिबट्यांना पकडण्यात यश आले आहे.
बिबट्यांच्या हल्ल्यात दोन मुले आणि एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर वन विभागाने विविध ठिकाणी पिंजरे लावले होते. त्याच कारवाईदरम्यान फाकडे आणि चांडोह गावांत दोन बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती तालुका वनाधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी दिली.
फाकडे येथे पोपट फिरोदिया यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात सुमारे सहा वर्षांची मादी बिबट्या अडकली. तर चांडोह येथे भाऊ मारुती पानमंद यांच्या शेतात चार वर्षांची मादी बिबट्या जेरबंद झाली. दोन्ही बिबट्यांना पुढील उपचार व देखरेखीसाठी माणिकडोह बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आल्याचे गव्हाणे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, नागरिकांनी रात्रीच्या वेळी सतर्कता बाळगावी आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही वन विभागाकडून करण्यात आले आहे.
