पुणे : शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत वारंवार चिंता व्यक्त करत पोलिसांना ‘गुन्हेगारी रोखा’ असा आदेश देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आणि टीका सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने कुख्यात गुंड गजानन मारणे यांची पत्नी जयश्री मारणे, गुंड बंडू आंदेकर यांच्या स्नुषा सोनाली आंदेकर आणि भावजय लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय, गुंड कुमार उर्फ बापू नायर यालाही थेट उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर या दोघी सध्या कारागृहात असून त्या तुरुंगातूनच निवडणूक लढविणार आहेत.
नाना पेठेतील आयुष कोमकर खून प्रकरणातील आरोपी सोनाली आंदेकर या तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या पत्नी आहेत. तसेच माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक २३ मधून या दोघींनी अर्ज दाखल केला असून न्यायालयाने त्यांना निवडणूक लढविण्याची परवानगी दिली आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात त्यांनी अर्ज सादर केले आहेत.
दरम्यान, गजानन मारणे यांची पत्नी जयश्री मारणे यांनी प्रभाग क्रमांक १० मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्या यापूर्वी २०१२ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. तसेच, प्रभाग क्रमांक ३९ अप्पर-इंदिरानगर येथून गुंड कुमार उर्फ बापू नायर हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून निवडणूक लढवित आहे.

महापालिका निवडणुकीत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिली जाणार नाही, असे दावे सर्वच राजकीय पक्षांकडून सातत्याने केले जात होते. मात्र, प्रत्यक्षात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील सदस्यांना तिकीट देण्यात आल्याने या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यापूर्वीही अशा उमेदवारींवरून पक्षांना टीकेला सामोरे जावे लागले होते. यंदाच्या निवडणुकीतही तोच विरोधाभास पुन्हा एकदा समोर आला आहे.
