पुणे : आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर संचलित न्यू इंग्लिश स्कूल, अष्टापूर येथे वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत विविध क्रीडाप्रकारांत आपले कौशल्य सादर केले.
स्पर्धांचे उद्घाटन स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्रीहरी कोतवाल यांच्या हस्ते झाले. यावेळी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक शामराव कोतवाल, आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य रमेश कोतवाल, स्कूल कमिटी सदस्य, अष्टापूर गावचे माजी उपसरपंच तयाजी जगताप, विजय कोतवाल, माजी उपसरपंच सोमनाथ कोतवाल, अष्टापूर विविध कार्यकारी विकास सोसायटीचे माजी उपाध्यक्ष सुरेश कोतवाल, युवा उद्योजक संतोष कोतवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सुरेश ओंबळे यांनी विद्यार्थ्यांना क्रीडाशपथ दिली. त्यानंतर प्रशस्त मैदानावर कबड्डी, रस्सीखेच, गोळाफेक व धावणे अशा विविध स्पर्धा पार पडल्या. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
उद्घाटनप्रसंगी श्रीहरी कोतवाल व सोमनाथ कोतवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत जीवनात खेळाचे महत्त्व अधोरेखित केले . विजयी खेळाडू व संघांचे अभिनंदन आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, सचिव शांताराम पोमण तसेच यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांनी केले.

विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुभाष काळे यांनी केले. सूत्रसंचालन सहशिक्षक बाळासाहेब ढवळे यांनी केले तर आभारप चौरंगनाथ कामथे यांनी मानले. मुख्याध्यापक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले.
