पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी सकाळपासून सुरू झाली. मात्र, प्रत्येक प्रभागातून मोठ्या संख्येने इच्छुकांनी अर्ज दाखल केल्याने आणि त्यावर विविध आक्षेप घेतले गेल्याने अनेक क्षेत्रीय कार्यालयांमध्ये छाननीची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सात ते आठ प्रभागांमध्ये उमेदवारांच्या अर्जांवर प्रतिस्पर्धी पक्षांच्या उमेदवारांनी हरकती घेतल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर सुनावण्या घ्याव्या लागल्या.
महापालिकेच्या ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तब्बल ३ हजार ५९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे प्रत्येक जागेसाठी सरासरी १२ ते १५ उमेदवार रिंगणात असल्याचे चित्र आहे. यामध्ये विविध राजकीय पक्षांचे उमेदवार तसेच मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
छाननीदरम्यान जातीचे दाखले चुकीचे असल्याचा आरोप, खोटे प्रतिज्ञापत्र, लग्नाच्या प्रमाणपत्रातील त्रुटी, महापालिकेचा मिळकतकर थकबाकी, तसेच ‘ना हरकत प्रमाणपत्र’ नसल्याचे आक्षेप घेण्यात आले. या हरकतींच्या निवारणासाठी छाननी प्रक्रिया अनेक ठिकाणी थांबवावी लागली. काही क्षेत्रीय कार्यालयांत किरकोळ वादाचे प्रकारही घडले.
मात्र, ज्या प्रभागांत कमी आक्षेप होते, तेथे छाननी प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली. यामध्ये येरवडा-कळस-धानोरी, बावधन-भुसारी कॉलनी, वानवडी आणि औंध-बाणेर प्रभागांचा समावेश आहे.

दरम्यान, महापालिकेचे माजी सभागृहनेते सुभाष जगताप (प्रभाग ३६), भाजपच्या उमेदवार रेश्मा अनिल भोसले (प्रभाग ७), राष्ट्रवादीच्या नंदिनी सिद्धार्थ धेंडे (प्रभाग २) आणि काँग्रेसचे अविनाश बागवे यांच्या अर्जांवर घेतलेले आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळले असून त्यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणूक रिंगणातील चुरस अधिकच वाढण्याची शक्यता आहे.
