पुणे: आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर संचलित न्यू इंग्लिश स्कूल, अष्टापूर (ता. हवेली) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचवून मुलींच्या शिक्षणासाठी आयुष्य वाहणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष काळे तसेच सोमनाथ कोतवाल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले यांच्या वेशात साकारलेली विद्यार्थिनी रिद्धी शिवाजी कोतवाल हिने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याविषयी माहिती सांगितली. तसेच देवकर रितिका धनंजय व इयत्ता नववीतील विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जन्म, शिक्षण व सामाजिक कार्यावर मनोगत व्यक्त केले.

सहशिक्षिका सुशीला सातपुते यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जन्म, शिक्षण व स्त्रियांसाठी केलेल्या कार्याची सविस्तर माहिती दिली. सहशिक्षिका सुषमा दरेकर यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा माहितीपट उलगडून दाखविला.
मुख्याध्यापक सुभाष काळे यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणविषयक विचारांवर व कार्यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन जीवन उज्ज्वल करण्याचा व यशस्वी होण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सुशीला सातपुते यांनी केले, तर सहशिक्षिका कल्पना तांबे यांनी आभार व्यक्त केले.
