पुणे: महाराष्ट्र पोलिस दलाच्या स्थापना दिनानिमित्त (२ जानेवारी) उरुळी कांचन पोलिस ठाण्यातील कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.
सामाजिक कार्यकर्ते अनिल कदम यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात पोलिस दलाच्या शौर्य, शिस्त आणि समर्पणाचा गौरव करण्यात आला.
‘ सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ’ या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन राज्याच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावणारे महाराष्ट्र पोलिस दल समाजासाठी वंदनीय असल्याचे गौरवोद्गार महंत गोपालव्यास कपाटे महानुभाव यांनी यावेळी काढले.
कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करताना जनतेचा विश्वास जपणाऱ्या पोलिसांच्या कार्याची त्यांनी विशेष प्रशंसा केली.

या सन्मान सोहळ्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्यासह पोलिस कर्मचारी उध्दव गायकवाड, सुजाता भुजबळ, सुवर्णा गायकवाड आदींना त्यांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेसाठी सन्मानित करण्यात आले.
कायदा व सुव्यवस्था राखताना तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास पोलिस पाटील विजय टिळेकर, सामाजिक कार्यकर्ते अनिल कदम, ग्रीन फाउंडेशन अध्यक्ष संतोष चौधरी, संदीप कांचन, प्रमोद कांचन, नंदकुमार मुरकुटे, पत्रकार अमोल भोसले, बापुसो चौधरी, भाऊसाहेब महाडिक यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित वक्त्यांनी महाराष्ट्र पोलिस दलाच्या सामाजिक सुरक्षिततेतील मोलाच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अशा सन्मान सोहळ्यांमुळे पोलिस दलाच्या मनोबलात वाढ होऊन ते अधिक जोमाने जनसेवा करतील, असा विश्वास उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला.
