पुणे : लोणी काळभोर पोलिस ठाण्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारतीय समाजात शिक्षणाच्या माध्यमातून आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा यावेळी आदरपूर्वक गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यानंतर उपस्थित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या जीवनकार्यावर प्रेरणादायी विचार व्यक्त केले. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका असून त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने सन १८४८ मध्ये पुणे येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षणक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली.
समाजातील तीव्र विरोध, अपमान व शारीरिक त्रास सहन करूनही त्यांनी स्त्री शिक्षणाचा आणि सामाजिक समतेचा लढा अखंडपणे सुरू ठेवला.
स्त्री शिक्षण, दलित-वंचित समाजाचा विकास, विधवा पुनर्विवाह, बालविवाहाला विरोध तसेच अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यभर संघर्ष केला. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, हा विचार आजच्या काळातही मार्गदर्शक ठरत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

या कार्यक्रमास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार, पोलिस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, महिला पोलिस उपनिरीक्षक पूजा माळी, पोलिस हवालदार वैजनाथ शेलार, महिला पोलिस हवालदार ज्योती नवले, महिला पोलिस हवालदार अश्विनी पवार, महिला पोलिस शिपाई उषा थोरात, वनिता यादव, कोमल आखाडे, आरती जमाले, रेश्मा थोरात, सुवर्णा केंद्रे, माधुरी चौधरी, उज्वला डिंबळे, मिना वाघाडे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा अंगीकार करून समाजात समानता, न्याय, शिक्षणाचा प्रसार आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.
या उपक्रमामुळे पोलिस प्रशासनात सामाजिक जाणीव, संवेदनशीलता आणि प्रेरणा निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.
