पुणे : उरुळी कांचन (हवेली) येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात थोर समाजसुधारिका व भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
“ती लढली म्हणून आम्ही घडलो” या विचारधारेवर आधारित या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग व महिला समन्वय कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. समीर आबनावे होते. व्यासपीठावर अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष प्रमुख प्रा. डॉ. निलेश शितोळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शुभांगी धुमाळ, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. सुजाता गायकवाड, ‘मणिरत्न’ माजी विद्यार्थी संघ समन्वयक प्रा. अनुप्रिता भोर, संगणक विभाग प्रमुख प्रा. वैशाली चौधरी, इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. अमोल बोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. आबनावे यांनी सावित्रीबाई फुले या केवळ पहिल्या महिला शिक्षिका नव्हत्या, तर समाजसुधारक, कवयित्री आणि भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीच्या पहिल्या नेत्या म्हणून त्यांनी स्त्रियांना नवे आयाम दिले, असे प्रतिपादन केले.
इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. अमोल बोत्रे यांनी पुण्यातील साथीच्या रोगाच्या काळात सावित्रीबाईंनी हडपसर–सासवड रस्त्यालगत उभारलेल्या रुग्णालयांमध्ये जाऊन रुग्णांची सेवा केल्याचा उल्लेख केला.

महिला समन्वय कक्षाच्या समन्वयक प्रा. सुजाता गायकवाड यांनी सावित्री जयंतीचे महत्त्व सांगत सावित्रीच्या लेकींनी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले.
विद्यार्थिनी कु. प्रियांका टिळेकर व कु. स्नेहा कदम यांनी मनोगते व्यक्त करत आज समाजात दिसणारी प्रगती ही सावित्रीबाईंच्या संघर्षाचे फलित असल्याचे मत मांडले.
कार्यक्रमात सावित्रीबाईंच्या क्रांतिकारी विचारांना उजाळा देण्यात आला.
प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख प्रा. सारिका ढोणगे यांनी केले. सूत्रसंचालन हितेश राऊत यांनी केले, तर आभार कु. पलक कानकाटे हिने मानले. कार्यक्रमास प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
