पुणे : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील बी. जी. शिर्के बाल विकास केंद्रात ड्रिम्स युवा सोशल फाऊंडेशनच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी (ता. ४)आयोजित महा रक्तदान शिबिरात तब्बल ९४५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घडवले. यामध्ये २५३ युवकांनी पहिल्यांदाच रक्तदान केले, तर ४१ महिलांनीही सक्रिय सहभाग नोंदवला, ही विशेष उल्लेखनीय बाब ठरली.
या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना सुनील लिमये (सदस्य, पर्यावरण समिती, सर्वोच्च न्यायालय, भारत सरकार) यांनी “पर्यावरणपूरक उपक्रमांची जाणीवपूर्वक अंमलबजावणी ही आजच्या काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन केले.
समाजोपयोगी उपक्रमांसोबतच पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास महादेव मोहिते (उपवन संरक्षक, पुणे विभाग), प्रा. के. डी. कांचन (उपाध्यक्ष, महात्मा गांधी सर्वोदय संघ), तुषार माळी (मुख्य कार्यकारी अधिकारी, पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण युवक कौशल्य योजना, महाराष्ट्र राज्य) यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे महादेव मोहिते यांनी आगामी काळात वन विभागामार्फत वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, तसेच शिंदवणे घाट परिसरात ऑक्सिजन पार्क उभारण्यासाठी वन विभाग सक्रिय भूमिका बजावेल, असे आश्वासन दिले.
यावेळी परिवहन विभागाचे मोटार निरीक्षक कलमबरकर यांनी रस्ते वाहतूक सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करून उपस्थितांकडून वाहतूक नियमांचे पालन करण्याची शपथ घेतली.

अध्यक्षीय भाषणात प्रा. के. डी. कांचन यांनी ड्रिम्स युवा सोशल फाऊंडेशनच्या सातत्यपूर्ण समाजोपयोगी कार्याचे कौतुक करत युवकांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी संस्थेचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
या शिबिरासाठी ससून ब्लड बँक, तर्पण ब्लड बँक, महा ब्लड बँक व स्पंदन ब्लड बँक यांनी सहकार्य केले. रक्तसंकलनाची प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध व सुरक्षित पद्धतीने पार पडली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील शेलार यांनी केले. प्रास्ताविकात निलेश जाधव यांनी संस्थेच्या ११ वर्षांच्या सामाजिक कार्याचा आढावा मांडला, तर आभार अथर्व कदम यांनी मानले.
हा महा रक्तदान शिबिर व वर्धापन दिनाचा कार्यक्रम समाजोपयोगी उपक्रम, पर्यावरण संवर्धन आणि मानवीय मूल्यांचे उत्कृष्ट उदाहरण ठरल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
