पुणे : “पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) हे दूरदृष्टी, जागतिक उद्दिष्टे आणि आधुनिक शैक्षणिक मूल्ये जपणारे २१ व्या शतकातील अत्याधुनिक शिक्षणकेंद्र आहे. जागतिक दर्जाचे विद्यापीठ म्हणून ही संस्था वेगाने प्रगती करत आहे,” असे गौरवोद्गार परम महासंगणकाचे शिल्पकार डॉ. विजय भटकर यांनी काढले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ शनिवारी (दि. ३) विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये उत्साहात पार पडला. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. भटकर बोलत होते. त्यांनी विद्यापीठाच्या ध्येयधोरणांचे, दीर्घकालीन शैक्षणिक दृष्टीचे तसेच प्रस्तावित केंद्रीय संशोधन सुविधा व संशोधन केंद्रांचे विशेष कौतुक केले.
आंतरशाखीय संशोधन, नवोन्मेष आणि उद्योगाशी निगडित व्यावहारिक समस्यांच्या निराकरणासाठी हे केंद्र महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील म्हणाले की, “जागतिक दर्जाचे उद्योग-संलग्न विद्यापीठ म्हणून विकसित होणे हे पीसीयूचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार देशाच्या विकासात सहभागी होण्यासाठी आम्ही पूर्ण क्षमतेने सज्ज आहोत.”

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांनी पीसीयूची शैक्षणिक रचना बहुविषयक, लवचिक आणि सर्वांगीण शिक्षणास पूरक असल्याचे नमूद केले.
तर एसटीपी पुणेचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी उद्योगक्षेत्राच्या दृष्टीने उद्योजक घडविण्याची गरज अधोरेखित केली.
या समारंभात सुवर्णपदक प्राप्त निषाद देशमुख, प्रेरणा कदम, अस्मिता पाटील, मयुरी गव्हाणे, संजय ठाकरे यांच्यासह सर्व पदवीधर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी विद्यापीठाचा प्रगती अहवाल सादर केला. स्वागत डॉ. विधी वैरागडे, सूत्रसंचालन पूजा डोळस व आभार डॉ. रेणू पराशर यांनी मानले.
