पुणे : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील ज्येष्ठ इतिहास अभ्यासक खलिल शेख यांची दख्खन इतिहास संशोधक संस्था, पुणे यांच्या विश्वस्तपदी निवड झाल्याबद्दल मातोश्री रमाई आंबेडकर प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात शाळेच्या वतीने खलिल शेख यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या सन्मान सोहळ्यास शाळेच्या मुख्याध्यापिका शबाना शेख, सामाजिक कार्यकर्ते अमोल शिंदे तसेच पत्रकार अमोल भोसले, भाजप सरचिटणीस सुनील तुपे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत टाळ्यांच्या गजरात खलिल शेख यांचे अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांसमोरच त्यांच्या कार्याचा परिचय करून देण्यात आल्याने कार्यक्रमाला प्रेरणादायी वातावरण लाभले.

इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात खलिल शेख यांनी केलेले मोलाचे योगदान, त्यांचे अभ्यासपूर्ण लेखन तसेच संशोधनात्मक कार्य याबाबत उपस्थित मान्यवरांनी गौरवोद्गार काढले.

दख्खन इतिहासातील दुर्लक्षित पैलूंवर त्यांनी केलेले संशोधन, विशेषतः मावळ प्रदेशातील सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक घटनांवर टाकलेला प्रकाश, हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

एक मुस्लिम मावळा म्हणून इतिहासाकडे पाहण्याची त्यांची अभ्यासू व समन्वयाची दृष्टी समाजात आदराने पाहिली जाते. विविध समाजघटकांतील लोक त्यांच्या माध्यमातून इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही वक्त्यांनी सांगितले. त्यांच्या निवडीमुळे इतिहास संशोधनाच्या क्षेत्राला नवी दिशा मिळेल, तसेच विद्यार्थ्यांना इतिहास अभ्यासाची गोडी आणि प्रेरणा मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

खलिल शेख यांच्या या निवडीबद्दल शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातून सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *