पुणे : लेझीम हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक व्यायाम व लोकनृत्य प्रकार असून ढोल, ताशा, झांजा यांच्या गजरात सादर होणारा हा कठोर व्यायाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी उपयुक्त ठरत आहे. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना आणि सांस्कृतिक जाणीव निर्माण करण्याचे काम लेझीम करत असल्याचे मत महंत गोपालव्यास कपाटे महानुभाव यांनी व्यक्त केले.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खेडेकर मळा येथे अनिल बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना लेझीम साहित्य व खाऊ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना महंत कपाटे बाबा बोलत होते.
समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून कोणतीही परिस्थिती नसताना चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी सातत्याने शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविणारे अनिल कदम हे खऱ्या अर्थाने ‘अवलिया’ असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या कार्यातून आजच्या तरुण पिढीने प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
अनिल बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल कदम यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होत असून निरपेक्ष भावनेने समाजासाठी काहीतरी करण्याची शिकवण मिळत आहे, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्या कविता खेडेकर, महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक महोत्सव समितीचे हवेली तालुका प्रतिनिधी दिलीप गाडेकर, दत्ता होले, सुनिल कदम, शरद खेडेकर, कोमल गणेश कांबळे, सुवर्णा कांचन, केसरी पत्रकार अमोल भोसले, आप्पा वाघमोडे, शाळेच्या मुख्याध्यापिका शुभदा मुळे, अंजना बेडेकर, नवनाथ जगताप, स्वाती रासकर, जयश्री तुपे, संतोष कदम, गणेश कांबळे तसेच शिक्षकवृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप गाडेकर यांनी केले, सूत्रसंचालन सुनिल तुपे यांनी केले तर आभार अनिल कदम यांनी मानले.
