पुणे : स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान संचलित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर (माध्यमिक विभाग) यांचे वार्षिक स्नेहसंमेलन “SWAMINI” या प्रेरणादायी संकल्पनेवर अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व सांस्कृतिक वैभवाने परिपूर्ण वातावरणात पार पडले. स्वावलंबन, आत्मबळ, नेतृत्वगुण, नैतिक मूल्ये व सामाजिक जबाबदारी यांचा समन्वय साधणारी ही संकल्पना विद्यार्थ्यांच्या विविध सादरीकरणांतून प्रभावीपणे उलगडली.

नृत्य, नाट्य व गीतांच्या माध्यमातून कर्तव्यनिष्ठा, धैर्य, सेवा, देशप्रेम व संस्कार यांचे दर्शन घडले. प्रत्येक सादरीकरणात विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, सृजनशीलता व संघभावना ठळकपणे दिसून आली.

उपस्थित पालक व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणांचे भरभरून कौतुक केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व अध्यक्ष प्रदीप कुंभार, संस्थाध्यक्ष सुरेश कांचन, उपाध्यक्ष सुरेश सातव, सचिव पंडित कांचन, खजिनदार प्रकाश कांचन यांच्यासह विश्वस्त रविंद्र बडेकर, संभाजी कांचन, कमलाकर अहिनवे, अक्षय कांचन व साहेबराव कांचन उपस्थित होते. शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर म्हणून नुपूर कांचन, सुमित दास व सरिता राऊत यांनीही कार्यक्रमाची शोभा वाढवली.

अध्यक्षीय भाषणात प्रदीप कुंभार यांनी “SWAMINI” संकल्पनेशी सुसंगत सांस्कृतिक कार्यक्रमांचे विशेष कौतुक केले. मुख्याध्यापिका उज्ज्वला साळुंके यांनी वार्षिक अहवालात शाळेचा सलग नऊ वर्षांचा दहावीचा शंभर टक्के निकाल ही अभिमानाची बाब असल्याचे नमूद केले.

इंद्रभान धुमाळ यांनी शिस्तबद्ध आयोजनाबद्दल मुख्याध्यापिका उज्ज्वला साळुंके, मार्गदर्शक राम चव्हाण व बालवाडी विभागप्रमुख वैशाली जगताप यांचे अभिनंदन केले.

सूत्रसंचालन वृषाली टिळेकर, अनिता पाटील व प्रमोद धेंडे यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन स्वाती कांचन व सविता दोरगे यांच्या नेतृत्वाखाली झाले. संगणक विभागाने सादर केलेल्या पीपीटीचेही विशेष कौतुक झाले.

संपूर्ण स्नेहसंमेलन शाळेच्या मूल्याधिष्ठित शिक्षण, शिस्तप्रिय संस्कार व सर्वांगीण विकासाची उज्ज्वल साक्ष देणारे ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *