णे : आद्य मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केलेल्या ‘दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्राच्या स्मृतिप्रीत्यर्थ लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था, शाखा उरुळी कांचन यांच्या वतीने मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी समाजप्रबोधन व लोकशिक्षणात पत्रकारितेचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.
कार्यक्रमाला उरुळी कांचन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन वांगडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले, “बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ सुरू करताना समाजपरिवर्तनाचा स्पष्ट उद्देश ठेवला होता. वृत्तपत्र हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, आजच्या काळात निर्भीड व सत्यशोधन करणारी पत्रकारिता अधिक गरजेची आहे. प्रलोभनांना बळी न पडता समाजातील वास्तव प्रश्नांना प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे.”

ते पुढे म्हणाले, “अवघ्या विसाव्या वर्षी जांभेकरांनी ‘दर्पण’ सुरू केले. ब्रिटिश काळात मराठी व इंग्रजी अशा दोन स्तंभांतून हे वृत्तपत्र प्रसिद्ध होत असे. इंग्रज सत्ताधाऱ्यांपर्यंत येथील जनतेच्या व्यथा पोहोचाव्यात, यासाठी इंग्रजी लेखनाचा प्रभावी वापर त्यांनी केला. समाजपरिवर्तन व सत्यशोधन हाच पत्रकारितेचा गाभा आहे.”
यावेळी पत्रकार सुनील जगताप, सुवर्णा कांचन, सहदेव खडागळे, सुनील तुपे, अमोल भोसले, पप्पू चिकणे, बापूराव चौधरी यांच्यासह पतसंस्थेचे संचालक शिवाजी माळी, विभागीय विस्तार अधिकारी कमलाकर पाटील, शाखा अधिकारी अभिजीत साखरे, सल्लागार व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल भोसले यांनी केले, तर आभार अभिजीत साखरे यांनी मानले.
