पुणे : देशाचा सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, तसेच भारतीय ज्ञान प्रणालींच्या सखोल पैलूंचे आकलन व्हावे, या उद्देशाने पुण्यातील नेशन फर्स्ट आणि चाणक्य मंडल परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारत विमर्श’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत पहिला कार्यक्रम रविवार, ११ जानेवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत बंगलोर–मुंबई महामार्गावर बाणेर येथील बंटारा भवनच्या सभागृहात होणार आहे. कार्यक्रमासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नसल्याची माहिती नेशन फर्स्टचे संस्थापक सुनील भोसले यांनी दिली.
भोसले म्हणाले की, तरुण पिढीला भारताची प्रगतशील संस्कृती, गौरवशाली इतिहास आणि प्राचीन भारतीय मूल्यांची ओळख करून देण्यासाठी ‘भारत विमर्श’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पहिल्या आवृत्तीत ‘बोध’ या थिंक टँकचे सह-संस्थापक तसेच भारतीय शिक्षण व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक पंकज सक्सेना यांच्या उद्घाटनपर भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात होईल.

यानंतर ‘देवालय’ या विषयावर होणाऱ्या चर्चात्मक सत्रात पंकज सक्सेना यांच्यासह प्रसिद्ध लेखिका व संशोधिका मोनिदीपा बोस डे आणि ‘टेम्पल हेरिटेज ऑफ इंडिया’ या पुस्तकाचे लेखक रामकृष्ण कोंगाल्ला सहभागी होतील. मंदिरांचा इतिहास, वास्तुकला आणि भारतीय वारसा या विषयांवर ते आपले विचार मांडतील.
‘इशाना’ या ईशान्य भारतावरील सत्रात अरुणाचल प्रदेशातील सामाजिक कार्यकर्त्या माया मुरतेम आणि आझाद हिंद फौज, इम्फाळ फ्रंटचे संस्थापक सदस्य प्रेमानंद शर्मा सहभागी होतील.

दुपारच्या ‘इतिहास’ सत्रात लेखिका अमी गनात्रा, रामायण व तमिळ साहित्याचे अभ्यासक जटायू आणि इतिहास संशोधक अमृतांशु पांडे यांचे व्याख्यान होईल.
चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक आणि माजी प्रशासकीय अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या भाषणाने ‘भारत विमर्श’ कार्यशाळेचा समारोप होणार आहे.

अधिक माहितीसाठी संयुक्ता भोसले (९५२७४८४९५९) यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *