पुणे : स्वयंशिस्तीमुळे वैयक्तिक स्वातंत्र्यावर मर्यादा येत नसून, प्रत्यक्षात ती आपले संरक्षणच करते. वाहतूक सुरक्षा ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असून, खरे सामर्थ्य वेगात नसून नियंत्रणात असते. हे वास्तव तरुणांनी समजून घेऊन वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पुणे परिमंडळ-५चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी केले.
एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठात पोलिस वर्धापन दिन आणि रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित व्यसनमुक्ती व वाहतूक जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाचे आयोजन एमआयटी एडीटी विद्यापीठ, हडपसर वाहतूक विभाग आणि लोणी काळभोर पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
कार्यक्रमास एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनिता कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., हडपसर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, विद्यार्थी कल्याण सहाय्यक संचालक डॉ. प्रतिभा जगताप, अधिष्ठाता डॉ. गणेश पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.

कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस. यांनी विद्यार्थ्यांना जीवनात ‘३६० अंश दृष्टिकोन’ अंगीकारण्याचे आवाहन केले. सर्वांगीण विकासासाठी स्वयंशिस्त ही पहिली पायरी असून, स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करून व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संकल्प करण्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन व विश्वशांती प्रार्थना झाली. प्रास्ताविकात कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांनी स्वयंशिस्तीचे महत्त्व अधोरेखित केले. पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी वाहतूक नियमांचे पालन करण्यावर भर देत विद्यापीठातील शिस्तीचे कौतुक केले.
वाहतूक निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी रस्ता सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आभार डॉ. प्रतिभा जगताप यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
अंतर्गत सुरक्षेसाठी ‘कम्युनिटी पोलिसिंग’ महत्त्वाचे असून, तरुणांनी पोलीस वर्धापन दिन सप्ताहात पोलिसांशी संवाद साधावा. पोलिस स्टेशनला भेट देऊन कार्यपद्धती समजून घ्यावी आणि वाहतूक व्यवस्थापनात स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. शिंदे यांनी केले.
आई-वडील हे आद्य गुरू, शिक्षक हे दुसरे गुरू; मात्र वर्तन बिघडल्यास तिसरे गुरू म्हणजे पोलिस हस्तक्षेप करतात, अशी कोटी करताच उपस्थितांमध्ये हास्याची लाट पसरली.