पुणे : लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ (केंद्रीय नीती आयोग संलग्न) यांच्या वतीने सन २०२६ च्या मध्य प्रदेश आवृत्ती दिनदर्शिकेचे भव्य प्रकाशन ‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्र पत्रकार दिनाचे औचित्य साधून इंदौर येथील दै. मराठा प्रहार कार्यालयात उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत कुंजीर (संस्थापक अध्यक्ष – क्षत्रिय मराठा नवनिर्माण सेना, मुख्य संपादक – दै. मराठा प्रहार व मराठा प्रहार न्यूज चॅनल) होते. प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवी व विविध संस्थांचे पदाधिकारी मिलिंद दिघे उपस्थित होते. यावेळी स्वाती मोहीते, धनंजय कोलार, ओम नम्र, ललित जैन भंसाली, दिलीप देशमुख तसेच लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे मध्य प्रदेश राज्य प्रभारी उमेश थोरात यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची प्रस्तावना दिलीप देशमुख यांनी केली. त्यांनी ‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा गौरव करत मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवून समाजप्रबोधनाचे महान कार्य त्यांनी केले, असे प्रतिपादन केले. याच औचित्याने मध्य प्रदेश आवृत्ती दिनदर्शिकेचे औपचारिक प्रकाशन करून उपस्थित पत्रकार, पदाधिकारी व मान्यवरांना दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात चंद्रकांत कुंजीर म्हणाले, “समाजाचा आरसा म्हणून काम करणारा पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. सत्य, निर्भीडता आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांवर पत्रकार सतत जनतेचा आवाज बनून उभा राहतो. अन्याय, भ्रष्टाचार आणि असत्याविरुद्ध लेखणी उचलून समाजाला योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करीत असतो.”

प्रमुख अतिथी मिलिंद दिघे यांनी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या २०२६ मध्य प्रदेश दिनदर्शिकेसह महासंघाच्या विविध सामाजिक व पत्रकारहिताच्या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. पत्रकारिता हे समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम असून पत्रकारांच्या सन्मान, हक्क व सामाजिक बांधिलकीसाठी महासंघ करत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे मध्य प्रदेश राज्य प्रभारी उमेश थोरात यांनी आपल्या मनोगतात महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजय बापू देशमुख निंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनात्मक कार्य अधिक बळकट होत असून पत्रकारांच्या हक्क, सन्मान व सामाजिक बांधिलकीसाठी महासंघ सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.