पुणे : मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केलेल्या ‘दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्राच्या स्मृतिदिनानिमित्त उरुळी कांचन पोलिस ठाण्यात मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा ‘दर्पण’ वृत्तपत्राला १९४ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमात बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. समाजप्रबोधन, सत्यनिष्ठ लेखन व लोकशिक्षण हा पत्रकारितेचा मूळ उद्देश असून, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची जबाबदारी पत्रकार प्रामाणिकपणे पार पाडत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. समाजातील अन्याय, अडचणी, समस्या व वास्तव शासन-प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करीत असल्याचेही उपस्थितांनी नमूद केले.
उरुळी कांचन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव करताना पोलिस व पत्रकार यांच्यातील समन्वय समाजहितासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या हस्ते उपस्थित पत्रकारांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास पोलिस कर्मचारी राजकुमार भिसे, अजित काळे व सुजाता भुजबळ, तसेच पत्रकार
सुनिल जगताप, सहदेव खंडागळे, सुवर्णा कांचन, भाऊसाहेब महाडिक, हनुमंत चिकने, बापुसो चौधरी, आनंद वैराट, शहाजी नगरे, सुनिल तुपे, अमोल महाडिक, खलिल शेख (सर्पमित्र) उपस्थित होते.
या उपक्रमामुळे पत्रकार व पोलिस यांच्यातील परस्पर विश्वास व सहकार्य अधिक दृढ होण्यास मदत होईल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हवेली तालुका पोलिस पाटील विजय टिळेकर यांनी केले, तर आभार अमोल भोसले यांनी मानले.