पुणे : जुन्नर तालुक्याच्या इतिहासात नोंद होईल असा आगळा-वेगळा विवाह सोहळा नुकताच आळेफाटा येथील साईलीला मंगल कार्यालयात पार पडला. पिंपरी पेंढार येथील उद्योजक सोपान दुरगुडे यांनी आपल्या मुलाच्या विवाहप्रसंगी सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबवत समाजापुढे नवा आदर्श ठेवला.

कॅन्सर मुक्त भारत अभियानात सक्रिय सहभाग घेत, कॅन्सर रोखण्यासाठी उपयुक्त मानल्या जाणाऱ्या तब्बल ३,०६६ लक्ष्मीतरूच्या रोपांची भेट विवाहासाठी आलेल्या सर्व नातेवाईक व पाहुण्यांना देण्यात आली. वाढते तापमान, बदलते हवामान आणि पर्यावरणाचा ऱ्हास लक्षात घेता “आपणही खारीचा वाटा उचलला पाहिजे” या उद्देशाने दुरगुडे कुटुंबीयांनी हा उपक्रम राबवला.
गुगलवर माहिती घेऊन बहुउपयोगी व औषधी गुणधर्म असलेल्या लक्ष्मीतरूची निवड करण्यात आली. केवळ रोपे वाटून न थांबता, ती जगवण्याचे आवाहन करण्यात आले. वर्षभरानंतर झाडे जगवलेल्या लाभार्थ्यांचे फोटो घेण्यात येणार असून, त्या अनुषंगाने विशेष लकी ड्रॉ काढून ११ जणांना सायकली भेट देण्यात येणार असल्याची घोषणा सोपान दुरगुडे यांनी केली.

विवाह सोहळ्यापूर्वी वर प्रथमेश व वधू सपना यांनी लक्ष्मीतरूचे पूजन व पाणी घालून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. आर्ट ऑफ लिविंगचे शिक्षक व कॅन्सर मुक्त भारत अभियानाचे प्रभाकर जगताप यांनी लक्ष्मीतरूचे आरोग्यदायी फायदे उपस्थितांना समजावून सांगितले.
या विवाह सोहळ्यास महाराष्ट्रभरातून तसेच पुणे जिल्ह्यातील जुन्नर, संगमनेर, चाकण एमआयडीसी परिसरातील नामांकित उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार शरददादा सोनवणे यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. आमदार काशिनाथ दाते, सत्यशील शेरकर, रामदास वेठेकर, माऊली खंडागळे, सरपंच सुरेखा वेठेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. सूत्रसंचालन गणेश व सुप्रिया मोढवे यांनी केले.