पुणे : पुरंदर तालुक्यात शुक्रवारी (ता. १६) रात्री घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सासवड पोलिस स्टेशन हद्दीतील वाघापूर चौफुला परिसरात शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या हिंसाचारादरम्यान कोयत्याने वार करत एकावर जीवघेणा हल्ला, हवेत गोळीबार, तसेच दोन मोटारसायकली पेटवून देण्यात आल्याने परिसर युद्धभूमीत रूपांतरित झाला.

या घटनेत कृष्णा बाबासाहेब हवलदार (वय 26, व्यवसाय पानटपरी, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. कृष्णा हवलदार यांनी सासवड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात ६ ते ७ जणांविरोधात विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हे दोन गट उरुळी कांचन (ता. हवेली) आणि गुन्होळी (ता. पुरंदर) परिसरातील असल्याची जोरदार चर्चा असून, या घटनेमुळे हवेली–पुरंदर सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर काही काळ नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती.

हाणामारीदरम्यान झालेल्या फायरिंगमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले, तर दुचाक्या पेटवून दिल्याने धुराचे लोट दूरवरून दिसत होते. भर चौकाजवळ घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या नेतृत्वाखाली सासवड पोलिस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची सखोल पाहणी करून जाळलेल्या मोटारसायकली व इतर महत्त्वाचे पुरावे ताब्यात घेतले आहेत.

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या हिंसाचारामागे जुना वाद, वर्चस्वाची लढाई की अन्य कोणते कारण आहे, याचा तपास पोलिस करत असून काही संशयितांची ओळख पटवण्यात आली आहे.

आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याबाबत बोलताना पोलिस निरीक्षक कुमार कदम म्हणाले,
“घटनेचा तपास वेगाने सुरू आहे. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *