पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येताच हवेली तालुक्यातील वाडे बोल्हाई–कोरेगाव मूळ गटात राजकीय तापमान प्रचंड वाढले आहे. देवदर्शन, पार्ट्या आणि पैशांच्या जोरावर मतं विकत घेण्याचा प्रयत्न सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीने मैदानात उतरवलेल्या सौ. दिपाली केतन निकाळजे यांनी या सगळ्या ‘सेटिंग’ला जोरदार धक्का दिला आहे.

‘ न विकणारी, न झुकणारी’ उमेदवार मैदानात आल्याने अनेक तथाकथित दिग्गजांचे राजकीय गणित कोलमडताना दिसत आहे. काही उमेदवारांना अजूनही जनतेचा स्वाभिमान पैशाने विकत घेता येईल, असा भ्रम आहे. मात्र यंदाची लढाई ‘श्रीमंत विरुद्ध गरीब’ नाही, तर थेट ‘धनशक्ती विरुद्ध जनशक्ती’ अशी होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
विकासकामांचा ठावठिकाणा नाही, रस्ते गायब आहेत, मूलभूत सुविधा नाहीत; पण निवडणूक आली की वारेमाप खर्च—या ढोंगी राजकारणाविरोधात वंचित बहुजन आघाडीने थेट एल्गार पुकारला आहे.
“आम्ही विकले जाणार नाही, आम्ही विकास घडवणार,” हा ठाम नारा देत दिपाली केतन निकाळजे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.

२४ तास लोकांमध्ये राहून काम करणारी कार्यकर्ती अशी ओळख असलेल्या दिपालीताईंना महिला आणि तरुणांचा मोठा पाठिंबा मिळत असून, गटात परिवर्तनाची हवा जोरात वाहू लागली आहे.
वाडे बोल्हाई गटात यंदा ‘मटण-भाकरी’वर निवडणूक लढवण्याचे दिवस संपत चालले आहेत. ही निवडणूक पोराबाळांच्या भविष्यावर, विकासावर आणि स्वाभिमानावर लढली जाणार असल्याचा ठाम सूर जनतेतून उमटत आहे. त्यामुळे यंदा ‘खोकेवाल्यांना’ घरी बसवून ‘डोकेवाल्यांना’ संधी मिळणार, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
दरम्यान, भाजपला रोखण्यासाठी आणि हुकूमशाही प्रवृत्तींविरोधात स्थानिक पातळीवर शिवसेना (उबाठा) आणि मनसेसोबत युती करण्याबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते केतन निकाळजे यांनी दिली आहे.
ही युती प्रत्यक्षात आली, तर वाडे बोल्हाई गटात राजकीय भूकंप अटळ असल्याचे बोलले जात आहे.
एकंदरीत काय, हवेली तालुक्यातील वाडे बोल्हाई गटात यंदा निवडणूक केवळ सत्तेसाठी नाही, तर स्वाभिमान, विकास आणि जनतेच्या हक्कांसाठी लढली जाणार असल्याचे चित्र ठळक होत आहे.