पुणे : पेठ येथे जमाव जमवून घरात घुसखोरी करत कुटुंबावर हल्ला केल्याची गंभीर घटना शनिवारी (ता. ८) सकाळी घडली. या प्रकरणी पाच आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सुरज भालचंद्र चौधरी (वय ३३, व्यवसाय शेती) यांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पेठ चारवाडावस्ती येथील सुरज भालचंद्र चौधरी हे सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास कुटुंबासह घरी असताना विजय रामचंद्र चौधरी व त्यांचा मुलगा ओम विजय चौधरी हे मोठमोठ्याने शिवीगाळ करत घरात घुसले. यावेळी विजय चौधरी यांच्या हातात चाकू, तर ओम चौधरी यांच्या हातात लोखंडी रॉड होता.
वाद वाढल्यानंतर विजय चौधरी यांनी सुरज चौधरी यांच्या वडिलांना मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या अक्षय चौधरी यांच्यावर चाकूने वार करून गंभीर दुखापत करण्यात आली.

दरम्यान, आई शोभा चौधरी यांनाही मारहाण करून त्यांचे कपडे फाडल्याचा आरोप तक्रारीत नमूद आहे. यानंतर तानाजी विलास चौधरी, हर्षद राजेश चौधरी व विशाल दीपक चौधरी हे तिघेही घरात दाखल झाले. सर्व आरोपींनी मिळून सुरज चौधरी, त्यांचे वडील भालचंद्र चौधरी व भाऊ संदेश चौधरी यांना लोखंडी रॉड, लाथा व बुक्क्यांनी मारहाण केली. हल्ल्यानंतर आरोपींनी घरातील सामानाची तोडफोड केली.

घटनेनंतर घराची पाहणी केली असता कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवलेली सुमारे एक लाख रुपयांची रोकड चोरीस गेल्याचे आढळून आले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या प्रकरणी सुरज चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३६/२०२६ अन्वये कलम ११८(१), ३३३, १८९(२), १९१(२), १९०, ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उरुळी कांचन पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *